संतोष देशमुख प्रकरणात अंजली दमानियांचा तीन्ही फरार आरोपींची हत्या झाल्याचा दावा; बीड पोलिसांनी धाडली नोटीस
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. आता अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अंजली दमानिया यांना नोटीस बजावली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
नोटीस मिळाल्यानंतर अंजली दमानिया यांनी सांगितले की, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे काल मला एक पत्र आले आहे. त्यात सगळी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच मी एसपींकडे पाठवली होती. त्याचे व्हॉइस मेसेज देखील मी पाठवले होते, सगळे डिटेल्स त्यांना दिले आहेत. पहिले दोन मेसेज जे डिलीट झाले आहेत त्याची देखील माहिती मी पोलिसांना दिली. हे पत्र बघून मला आश्चर्य वाटलं. पण स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती हवी असेल तर त्यांना मी माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या गावाच्या नावाचा उल्लेख व्हाइस मेसेजमध्ये आहे. त्या गावात पोलिसांनी पडताळणी केली का? तुम्ही त्या गावात जाणार का? असे विचारले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, मी जाण्यापेक्षा पोलिसांनी येथे ताबडतोब पथक पाठवणं गरजेचं होतं, ते पाठवले आहे की नाही याचा खुलासा पोलिसांनी करायला हवा होता. पण तो केलेला नाही. ही घटना गंभीर आहे. यातील तथ्य पोलिसांकडून बाहेर आले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. पण वेळ पडली तर मी तिथे जाणार आहे.