फसवणुकीचा नवा फंडा, भिकारी दिसा व पैसे कमवा, प्रकरण उघडकीस
दोन महिलांना फसवल्याप्रकरणी खार पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – पैसे कमवण्यासाठी कोण कसं डोकं लावेल काही सांगता येत नाही. चोरीचे ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत असून दिवसेंदिवस पैसे कमावण्याचे अनेक धोकादायक अन् अजब प्रकार समोर येत आहेत. याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून भिकारी दिसा अन् पैसे कमवा म्हणत घोटाळेबाजांनी फसवणुकीचा नवा मार्ग शोधल्याचं उघडकीस आलं आहे.
या प्रकरणात खार पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दोन महिलांना फसवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आपला मालक मुलगा झाल्याने पैसे दान करतोय अशी थाप आरोपीनी मारली होती. आरोपीनी फुसवणूक झालेल्या व्यक्तींना निर्जनस्थळी नेत त्यांच्याकडे असलेली सगळी रक्कम, अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितले. भिकारी दिसण्यासाठी हे गरजेचं असल्याचं सांगितले.
गरीब असल्याचं दिसलं तरच मालक पैसे देईल अशी थाप मारली. यानंतर आरोपीनी या महिलांकडचे दागिने गुपचूप चोरले. ७३ वर्षाच्या महिलेचे साडेतीन तोळ्याचे दागिने चोरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी अर्जुन काळे आणि बालाजी पवार अशी आरोपीची नावे असून ते फुटपाथवर राहणारे आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.