परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा पहिल्याच बॉलवर सिक्सर, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा घेतला मोठा निर्णय!
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – फडणवीस २.० सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं मिळालं. प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारताच मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. प्रताप सरनाईक ऍक्शन मोडवर आल्यानंतर आता अधिकाऱ्यांची देखील भंबेरी उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता परिवहन मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत लवकर कागदोपत्री निर्णय जाहीर केला जाणार, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. परिवहन खात्यातील बदल्या बढत्यांमध्ये पारदर्शकता आणण्याकरता ॲानलाईन बदल्या आणि बढत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी हाताशी घेऊन बदल्या होणार नाही. एसटी सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील असून संपूर्ण बदल्या ऑनलाईन करणार असल्याचं देखील सरनाईक यांनी म्हटलं आहे. याच आठवड्यात अंमलबजावणी होईल, अशी आश्वासन देखील सरनाईक यांनी दिलंय.
बंगळुरूच्या धर्तीवर ही वाहतूक व्यवस्था करण्यासाठी अहवाल मागवला असून त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत मिळेल का यासंदर्भात पुन्हा गडकरी यांच्याशी बोलणार असल्याचं देखील परिवहन मंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. एसटी बस महामंडळात टप्याटप्याने इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहोत. अगदी ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जातील. त्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे प्रवासांना सुविधा अधिक सुखद होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, चारवेळा आमदार राहिलेल्या प्रताप सरनाईक यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची वर्णी लागली. त्यानंतर आता सरनाईकांच्या हाती लालपरीचं स्टेअरिंग आल्याने आता धडाकेबाज निर्णय घेताना दिसत आहेत. अशातच आता परिवहन खात्याचा चेहरा बदलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.