पुण्यातील एसटी स्थानकाहून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकाच्या आवारात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा बस स्थानकात थरार पहायला मिळाला. त्यामुळे प्रवासी कुतूहलाने पोलिसांच्या या कारवाईकडे पहात होते. तो सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता. अमोल रवी आडम (२४) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक राहुल कोळंबीकर, संजय भापकर, कुंदन शिंदे, शंकर संपत्ते, सागर केकाण, राहुल तांबे, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, शरद गोरे यांनी ही कारवाई केली.
अमोल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात अपहरण, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्थान बद्धतेची कारवाई केली होती. तो नुकताच या गुन्ह्यातून सुटून बाहेर आला होता. दरम्यान आडम आणि साथीदारने १७ डिसेंबर रोजी कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे व राहुल तांबे यांना माहिती मिळाली की, आडम मूळगावी सोलापूर जाणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात सापळा लावला. अमोल आडम बस स्थानकात आल्यानंतर सोलापूर बसकडे जात असताना त्याला पथकाने त्याला पकडले.