बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं. अनुभवहीनता ही मोठी चूक. ७ जणांचा मृत्यू, तर ५० जण जखमी
योगेश पांडे /वार्ताहर
मुंबई – कुर्ला एलबीएस मार्गावर सोमवारी ९ डिसेंबरला मोठा अपघात घडला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५० जणं जखमी झाले आहेत. बेस्टची ३३२ नंबरची बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीकडे जात होती. ही बस रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या उडवत तब्बल ८० ते १०० च्या गतीने गेल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बस चालकाने तब्बल ३० ते ४० विविध वाहनांना धडक दिली. काही जण बसच्या चाकाखाली आले तर काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर केला. ही दृश्य थरारक आणि अंगावर काटा आणणारी आहेत. बस अपघातानंतर चालकाला पोलिसांनी अटक केली असून बसचालक संजय मोरे १ डिसेंबर रोजी कामावर रुजू झाला होता. त्याने बस चालविताना मद्यपान केलं नसल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे. त्यात चालकाने यापूर्वी कधीच इतकी मोठी बस चालवली नव्हती. त्याला ही बस चालविण्याचा अनुभव नसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याला वर्दळीच्या वेळी बस चालविण्याची जबाबदारी कोणी दिली यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.
बसची फॉरेन्सिक पथकानं तपासणी केली असता बसमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचंही दिसून आलंय. दरम्यान ४९ जखमींना कुर्ला आणि घाटकोपरमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या सर्व प्रकरणात सामान्यांनी नाहक जीव गमावला. या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ३३२ बस डेपोमधून सुटल्यानंतर काही अंतरावर एका पादचाऱ्याला धडकली होती. तो जवळजवळ चाकाखाली आला होता. यानंतर काहीजण ती बस थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र बसचालक थांबला नाही आणि तो भरधाव गतीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडत पुढे निघून गेला. यावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नसल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.