जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करुन मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या; चार लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त

Spread the love

जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करुन मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या; चार लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – जैन साधकांसारखी वस्त्रे परिधान करुन मंदिरातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सॅलिसबरी पार्क भागात चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी तपास करुन मुंबईतील गिरगाव परिसरातून चोरट्याला अटक केली. चोरट्याने पुण्यातील सॅलिसबरी, पिंपरीतील चिखली, मुंबईतील घाटकोपर, तसेच वाई परिसरातील मंदिरातून ऐवज लांबविल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्याने मुंबईतील झवेरी बाजारातील एका सराफाला सोन्याचा मुकुट विक्री केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी सराफ व्यावसाययिकाला नोटीस बजावली आहे. नरेश आगरचंद जैन (४८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी नरेश जैन सराइत चोरटा असून, त्याने आठ ते दहा जैन मंदिरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून सोन्याचा मुकूट, सोनसाखळी असा चार लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सॅलिसबरी पार्क भागातील एका महिलेने याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या बंगल्याच्या आवारात जैन मंदिर आहे. आरोपी नरेश साधकाच्या वेशात मंदिरात शिरला आणि सोन्याचा मुकूट, सोनसाखळी चोरून तो पसार झाला होता. १५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. स्वारगेट परिसरातील तीन ते चार मंदिरात अशाच पद्धतीने चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. जैन मंदिरात चोरी करणारा आरोपी मुंबईतील गिरगाव परिसरात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सागर केकाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, उपनिरीक्षक संतोष तानवडे, शंकर संपत्ते, आदी पोलिसांनी ही कामगिरी केली.

शहरातील जैन मंदिरात चोरीचे गुन्हे उघडकीस झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी स्वारगेट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. ७०० ठिकाणचे चित्रीकरण, तसेच तांत्रिक विश्लेषणातून आरोपी नरेश याचा माग काढण्यात आला. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी सांगितले की आरोपी नरेश जैन याने पुणे, पिंपरी, मुंबईतील जैन मंदिरात चोरी केल्याचे उघड झाले आहे. जैन साधकांप्रमाणे त्यांनी वेशभूषा परिधान करून मंदिरातून दागिने चोरले. सॅलिसबरी परिसरातील जैन मंदिरातील चोरीचा गुन्हा त्याने केल्याचे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon