ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी अमरसिंह जाधव यांची नेमणूक

Spread the love

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी अमरसिंह जाधव यांची नेमणूक

योगेश पांडे/वार्ताहर

ठाणे – ठाणे पोलीस दलात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी अमरसिंह जाधव यांची नेमणूक झाली आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी मागील काही दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबई- ठाण्यातील काही नेत्यांच्या गाठीभेट घेण्यास सुरुवात केली होती. अखेर या सर्वांत परिमंडळ – ५ चे उपायुक्त अमरसिंह जाधव यांची वर्णी लागली आहे. तर, अनुसूचित जाती जमाती आयोगावरील पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांची ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी बदली झाली आहे. अद्याप त्यांची नेमणूक कोणत्याही परिमंडळात करण्यात आलेली नाही. दुसरीकडे आता परिमंडळ – ५ उपायुक्तपद रिक्त झाल्याने याठिकाणी कोणाची वर्णी लागते याची चर्चा आता ठाणे पोलीस दलात रंगू लागली आहे.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत ठाणे, वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी अशा पथकांसह खंडणीविरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी पथक, मुद्देमाल कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, बाल संरक्षण कक्ष आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद मिळविण्यासाठी नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झालेली असते. सुमारे दीड महिन्यापूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पदावरील उपायुक्त शिवराज पाटील यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. ठाणे पोलीस दलातील महत्त्वाचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पद रिक्त झाल्याने ठाणे पोलीस दल आणि ठाण्याबाहेरील पोलीस दलातील पाच ते सहा अधिकाऱ्यांमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुखपद मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि ठाण्यातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. परंतु काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बदली स्थगित झाली होती. अखेर महायुतीची सत्ता पुन्हा एकदा बहुमतामध्ये आल्यानंतर सत्ता स्थापनेपूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तपदी अमरसिंह जाधव यांची नियुक्ती झाली आहे.

तर, अनुसूचित जाती जमाती आयोगावरील पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांची ठाणे पोलीस दलात उपायुक्तपदी बदली झाली आहे. अद्याप त्यांची नेमणूक कोणत्याही परिमंडळात करण्यात आलेली नाही. दुसरीकडे आता परिमंडळ पाचचे उपायुक्तपद रिक्त झाले आहे. या परिमंडळात कोपरी, वागळे इस्टेट, श्रीनगर, वर्तकनगर, चितळसर, कापूरबावडी आणि कासारवडवली हे पोलीस ठाणे येतात. हा संपूर्ण भाग ठाणे शहरात येतो. त्यामुळे या महत्त्वाच्या परिमंडळात कोणाची वर्णी लागते याची चर्चा आता ठाणे पोलीस दलात रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon