राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचा धक्कातंत्र ? फडणवीसांना तुर्तास संधी नाही?

Spread the love

राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचा धक्कातंत्र ? फडणवीसांना तुर्तास संधी नाही?

मुख्यमंत्रि‍पदासाठी १-४ च्या फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार? शपथविधी २ डिसेंबरला होण्याची शक्यता

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीची सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. भाजपला १३२ जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवावे, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार, याची चर्चा सुरु असताना एक नवी माहिती समोर आली आहे. त्यानुसार महायुतीकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी १-४ चा फॉर्म्युला अंमलात आणला जाऊ शकतो. या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील एक वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाऊ शकते. त्यानंतरची चार वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मराठाविरोधी ही तयार झालेली प्रतिमा आगामी काळात अडचण ठरु शकते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकी संपेपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी ठेवले जाऊ शकते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सुत्रे दिली जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे २०१६ साली मुख्यमंत्री असताना भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे आतादेखील फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी राहून त्यामध्ये योगदान देऊ शकतात, असाही एक मतप्रवाह आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, यासाठी आणखी एका नव्या फॉर्म्युलाचीही जोरदार चर्चा आहे. त्यानुसार आधी दोन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना, त्यानंतर दोन वर्षे एकनाथ शिंदे यांना आणि त्यानंतर एक वर्षे अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, अशीही चर्चा आहे. तसेच फडणवीस आणि शिंदे यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रि‍पदाची वाटणी होईल, अशाही फॉर्म्युलाची चर्चा सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यास भाजपकडून त्याची भरपाई केली जाऊ शकते. त्यानुसार शिंदे यांच्या पक्षाला केंद्रात महत्त्वाचे खाते मिळू शकते. तर श्रीकांत शिंदे यांचा राज्यातील मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेताना भाजपचे नेते त्यांची कशाप्रकारे मनधरणी करणार, हे पाहावे लागेल. शिंदे यांची समजूत काढण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon