मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर राडा, भाजपच्या प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची पोलिसांसोबत बाचाबाची 

Spread the love

मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर राडा, भाजपच्या प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची पोलिसांसोबत बाचाबाची 

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बुथवर भाजपच्या दिग्गज नेत्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत बाचाबाची सुरु असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. भाजपने या घटनेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप आहे. पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की आम्ही मुंबईतील विविध बुथवर भेटी देत आहोत. त्याचप्रमाणे सायन मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे दिली होती, म्हणून मी सायन कोळीवाड्यामधील बुथला भेट देत होतो. एका बुथवर जात असताना आम्हाला अडवण्यात आलं. ठीक आहे, आम्हाला अडवण्यात आलं. पण तिथे नितीन सोनकांबळे नावाचा अधिकारी होता आणि पीएसआय रेश्मा पाटील होत्या. एका बाजूला उबाठाचे सर्व लोकं तिथून आज जात होती. त्यांचा नगरसेवक जात होता. दुसऱ्या बाजूला एखादी सुपारी घ्यावी अशा पद्धतीने सोनकांबळे अधिकारी अत्यंत अर्वाच्य भाषेत आणि उर्मटपणे बोलत होता”, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

मी त्याला समजावलं की, अरे बाबा अधिकाऱ्यांनी वातावरण शांत करायचं असतं. पण तो ज्या पद्धतीने बोलतोय, गुन्हा दाखल करतोय, इकडे सांगतोय, तिकडे सांगतोय, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आमची बाचाबाची झाली. ते चालू असतानाच आतून मोठा लोंढा नगरसेवकांसमवेत बाहेर आला. मग आता एका बाजूला पोलीस किंवा प्रशासन म्हणून दोघांना समान न्याय द्यायला पाहिजे ना? पण तिथली सर्व व्यवस्था काँग्रेसच्या दावणीला बांधल्यासारखी वाटली. त्यामुळे आम्ही वडाळा पोलीस ठाण्याला गेलो. तिथे आम्ही आमची तक्रार दिली. ते त्याची चौकशी करतील, सीसीटीव्ही फुटेज तपासतील की, आतमध्ये कुणी गेलं होतं का? गेले असतील तर आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करायला लावू”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon