डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड; विष्णूनगर पोलीसांकडून अज्ञातव्यक्ति विरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे/वार्ताहर
डोंबिवली – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्रचाराला आता धार आली असून नेत्यांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काही मतदारसंघात धक्काबुक्की, हाणामारी झाल्याचा बातम्या येत आहेत. आता डोंबिवलीत भाजप नेत्याचं कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या खासगी कार्यालयात तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी अचानक कार्यालयात येत शिवीगाळ करत धक्काबुकी केली आहे. शिवीगाळ करत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये उपाध्याय यांनी तक्रार नोंदवली असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी विष्णूनगर पोलीस तपास करत असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला आहे. ही तोडफोड राजकीय कारणावरून झाली आहे की आणखी कोणत्या कारणावरून हे पोलीस तपासात उघड होणार असून फेसबुक पोस्टवरून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील गृजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तीन ते चार अज्ञात व्यक्ती अचानक तिथे धडकले. त्यांनी शिवीगाळ केली. मारहाण करून तोडफोड केली. डोंबिवली विधानसभेत कॅबिनेट मंत्री भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शनिवार, ९ नोव्हेंबर रोजी ऑल आऊट ऑपरेशन राबवले. हे ऑल आऊट ऑपरेशन आयुक्तालयातील पाचही झोनमध्ये राबवण्यात आले. या ऑपरेशन कारवाईत एकूण ३१२ अधिकारी आणि एक हजार २८८ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.