मोदी, शहा यांच्या बॅगा महाराष्ट्रातून जाताना तपासल्या पाहिजेत – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगची तपासणी, संतापलेल्या ठाकरेंचा थेट मोदी, शहांवर निशाणा
योगेश पांडे/वार्ताहर
वाशिम – उद्धव ठाकरे सोमवारी यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचले. दरम्यान हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. त्यांनी व्हिडीओ शूट करत तो शेअर केला आहे. तसंच निवडणूक अधिकाऱ्याला तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याही बॅग तपासा आणि व्हिडीओ शूट करुन मला पाठवा असं सांगितलं. “तुमचं नाव काय, कुठे राहणारे? आतापर्यंत कोणाच्या बॅगा तुम्ही तपासल्या आहेत. हा माझा पहिलाच दौरा आहे. पण माझ्याआधी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तपासली. तुम्हाला चार महिने झाले पण एकाही नेत्याची बॅग तपासली नाही. मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो. तुम्ही आतापर्यंत मिंधे, फडवणीस, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शाह यांची बॅग तपासली का? जर ते आले तर नरेंद्र मोदींच्या बॅगा तपासतानाचा व्हिडीओ मला आला पाहिजे. तिकडे शेपूट घालायची नाही,” असं उद्धव ठाकरे संतापून निवडणूक अधिकाऱ्याला म्हणाले.
माझा युरिन पॉटही तपासा, इंधनाची टाकीही तपासा असंही ते उपहासात्मकपणे यावेली म्हणाले. काय उघडायचं ते उघडा, नंतर मी तुम्हाला उघडणार आहे असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिला. हे लोक कोणत्या शासकीय नोकरीत आहे, हेदेखील पाहून घ्या असंही ते म्हणाले, व्हिडीओच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी कॅमेरामनला प्रश्न विचारला. तुम्ही मध्य प्रदेशचे आहात. गुजरातचे तर नाहीत. म्हणजे बॅगा तपासण्यासाठी देखील बाहेरच्या राज्यातील माणसं आहेत, असंही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतही बॅगा तपासल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “माझ्या बॅगा तपासल्या तो व्हिडीओ मी केला. मी हेलिकॉप्टरने आल्यानंतर ७ ते ८ जण माझ्या स्वागताला उभे होते. कशासाठी आले आहात विचारलं तर म्हणाले बॅगा तपासण्यासाठी असं सांगितलं. उद्या जर तुम्हाला कोणी अडवलं तपास अधिकाऱ्यांच्या खिशांपासून ते ओळखपत्रासह सगळं तपासा”. पुढे ते म्हणाले. ” जर तुम्ही उद्या शिंदे, फडणवीस, मोदींच्या बॅगा तपासल्या नाही तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील. तिथे पोलीस, निवडणूक आयोगाने यायचं नाही. ज्या प्रकारे आमच्या बॅगा तपासण्याचा अधिकार आहे, तसंच मतदारांना जो कोणी प्रचाराला येईल त्याची बॅग तपासण्याचा अधिकार आहे. तो बजावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून मिंधेंच्या बॅगा चालल्या होत्या. म्हणे त्यात कपडे होते. एवढे कपडे कोण घालतं. हा सगळा नालायकपणा सुरु असून, ही लोकशाही नाही. लोकशाहीत कोणी मोठा नाही, छोटा नाही. पंतप्रधानांनी मी सर्वांशी सारखा वागेन अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारालाही यायला हवं. कारण ते भाजपाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत,”