बाबा सिद्दीकी हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या शुटरला उत्तर प्रदेशातील बहारिचमधून अटक
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर तब्बल महिनाभरानंतर मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालंय. या प्रकरणात पोलिसांनी सिद्दीकी यांच्या गोळीबार करणाऱ्या मुख्य शुटरला उत्तर प्रदेशातील बहारिचमधून अटक केलीय. शिवकुमार गौतम असं या मुख्य शुटरचं नाव आहे. त्यानंच सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. त्या तपासासाठी गेल्या महिनाभरापासून मुंबई पोलीस जंग-जंग पछाडत होते. अखेर त्यांना यश मिळालंय. अर्थात मुंबई पोलिसांना हे यश सहज मिळालेलं नाही.
शिवकुमारला पकडण्यासाठी क्राइम ब्रांचचे संयुक्त पथक २१ दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांनी शिवकुमारचे नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या संपूर्ण डेटाची पडताळणी केली. ज्यामध्ये एकूण ४५ जणांचा समावेश होता. या सर्वांवर पोलिसांकडून बारीक लक्ष ठेवलं जात होतं. हे सर्व जण कुठं जातात? कुणाला भेटतात, या प्रत्येक क्षणाचा आढावा घेतला जात होता. या सर्वांच्या तपासणीनंतर संयुक्त पथकानं ३ जणांवर लक्ष केंद्रीत केलं. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर पोलीस काही दिवसांपासून बारीक लक्ष ठेवून होते, त्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले. हे चार जण शिवकुमार गौतमला भेटतात आणि त्याच्या सतत संपर्कात आहेत, याबाबत क्राईम ब्रँचला खात्री पटली. त्यानंतर क्राइम ब्रांचने त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. १० तारखेपर्यंत हे चार जण शिवकुमारला भेटायला जाण्यासाठी थांबले होते. शिवकुमारने ज्या ठिकाणी सेफ हाऊस बांधले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता. शिवकुमार तेथे पोहोचताच क्राइम ब्रांच आणि यूपी एसटीएफने त्याला आणि त्याच्या चारही साथीदारांना अटक केली. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग अशी या चौघांची नावं आहे. त्यांना शिवकुमारला आश्रय देऊन नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.