मुंबईतील फॅशन डिझायनरला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकीचा फोन, ५५ लाखांची मागितली खंडणी; शिवडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Spread the love

मुंबईतील फॅशन डिझायनरला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने धमकीचा फोन, ५५ लाखांची मागितली खंडणी; शिवडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिष्णोई टोळीची दहशत निर्माण झाली आहे. याच गोष्टीचा फायदा उचलून आता बिष्णोई टोळीच्या नावाने धमक्या देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. माझगाव डॉक इथं राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरला बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. आरोपींनी त्याच्याकडे ५५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदार घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने तो बिष्णोई टोळीतून बोलत असल्याचं सांगितलं. तसंच एका व्यक्तीचे ५५ लाख रुपये परत करण्यासाठी धमकावण्यात आलं. तुला सात दिवसांचा वेळ देतो. आमच्या विरोधात जाऊ नकोस, कुटुंब असलेला व्यक्ती आहेस. तुला जीवाची पर्वा नाही का?,” अशी धमकी फॅशन डिझायनरला देण्यात आली. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून प्रकरण मिटवून टाक, असंही आरोपीने धमकावलंय. सुरुवातीला तक्रारदाराने या धमकीच्या फोनकडे काणाडोळा केला. पण, नुकत्याच घडलेल्या घडामोडींनंतर त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला एका परिचित व्यक्तीने दिला. त्यानुसार तक्रारदाराने शिवडी पोलिसांत तक्रार नोंदवली असून याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सतत चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगकडून स्वीकारण्यात आली होती. जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदत करणार, त्याला आपला हिशोब तयार ठेवावा लागेल, अशी धमकीही या पोस्टद्वारे देण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर बिष्णोई गँगच्या नावाने विविध धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेता सलमान खानलाही बिष्णोईच्या नावाने धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिष्णोई हा फक्त गँगस्टरच नाही तर तो भारतासाठी फुटीरतावादी म्हणून काम करणाऱ्या खलिस्तानवादी संघटनांचा भागसुद्धा आहे. तो खलिस्तानवादी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा दावा करत एनआयएनं त्याच्याविरोधात युएपीए अंतर्गत खटला दाखल केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन चार्जशीट दाखल केल्या आहेत. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई हा कॅनडा आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon