केडीएमसी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या दालनात गोंधळ घालणा-या दिलीप नाना रोकडे यांच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांची भुमिका नेहमीच सकारात्मक असते. महापालिकेतील कार्यपध्दती जास्तीत जास्त पारदर्शकतेने चालावी आणि नागरिकांच्या समस्यांना वेळेत उत्तरे दिली जावीत, यासाठी महिन्यातील दुस-या मंगळवारी आयुक्तांचा जनता दरबार देखील आयोजित केला जातो आणि या जनता दरबारात महापालिका आयुक्त उपस्थित नागरिकांची स्वत: भेट घेवून, त्यांच्या समस्या जाणून घेतात. असे असताना देखील दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ६.३० वाजता दिलीप नाना रोकडे यांनी, त्यांनी केलेल्या तक्रार अर्जाबाबत अचानकरित्या आयुक्त महोदयांची भेट मागितली. तथापि, आयुक्त यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या स्विय सहाय्यकाने सदर भेट नाकारली असता, दिलीप नाना रोकडे यांनी आरडाओरड करीत आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला आणि आपल्या हातातील पेपर आयुक्त यांच्या टेबलावर आपटून, गोंधळ घातल्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत दिलीप नाना रोकडे यांच्या विरुध्द बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत प्रथम महापालिकेच्या परिमंडळ स्तरावर (संबंधित उपआयुक्त) तद्नंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचेकडे भेट घेवून पाठपुरावा करावा. तेथे समस्यांचे निराकरण न झाल्यास आयुक्त महोदया यांचे भेटीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केडीएमसीमार्फत करण्यात आले आहे.