अमरावतीत शिंदे सेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांमध्ये वाद, एकावर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती – अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या गाडीवर गोळीबाराची घटना घडली आहे. गाडीवर गोळीबाराच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर अमरावतीत वलगाव पोलीस स्टेशनचे फॉरेन्सिक पथक दाखल झाले. ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीची तपासणी करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिसात गोळीबार प्रकरणी तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पक्षांतर्गत व पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाल अरबट यांनी पोलिसात केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेल्या गोपाल अरबट यांचा ताफा अमरावतीहून दर्यापूरला जात होता. तेव्हा त्यांच्या गाडीवर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करीत आहेत.