चेन्नई एक्सप्रेसमध्ये धावत्या रेल्वेत मुलीचा विनयभंग; आरोपीला सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडून बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – चेन्नईला जाणाऱ्या रेल्वे गाडीत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी गुलबर्गा येथे शिक्षण घेत असून, मुंबईत कुटुंबीयांना भेटण्यासाठी आली होती. ती चेन्नई एक्सप्रेसने गुलबर्गा येथे परत जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएसएमटी- चेन्नई एक्सप्रेसच्या ए१ डब्यातून पीडित मुलगी प्रवास करत होती. यावेळी तिचे आई-वडीलही तिला सोडण्यासाठी सीएसएमटी स्थानकावर आले होते. शनिवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी ती रेल्वे सुटली. यावेळी मुलीची आजीही तिच्यासोबत प्रवास करत होती. त्या गुलबर्गा येथे जात होत्या. त्यावेळी एका तरूणाने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने त्याचा हात झटकला असता आरोपीने तिच्या कमरेत हात घातला. त्यामुळे ती घाबरली. तिने हा प्रकार आजीच्या कानावर घातला. पण तोपर्यंत तो तरूण तेथून निघून गेला होता. त्यावेळी पीडित मुलीच्या आजीने तो तरूण पुन्हा दिसल्यास आपल्याला कळवायला सांगितले.
त्यानंतर रेल्वे कर्जत स्थानकाजवळ आली असताना आरोपी तरूण पुन्हा तिच्या डब्यात दिसला. तिने त्याबाबत आजीला सांगितले. त्यावेळी दोघींनीही त्या तरूणाला याबाबत जाब विचारला असता त्यांने तक्रारदार तरूणीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने आरडाओरडा केला असता तिकीट तपासनीस व इतर सहप्रवासी तेथे आले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर कर्जत रेल्वे स्थानक आल्यानंतर त्याला कर्जत रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्या आले. त्यानंतर कर्जत व पुणे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार नोंदवली. त्यामुळे पीडित मुलीला त्याच रेल्वेने गुलबर्गाला जाता आले. पीडित मुलीची तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण हा गुन्हा सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे हे प्रकरण त्यांना वर्ग करण्यात आले. तसेच आरोपीचा ताबाही त्याला देण्यात आला. त्यानंतर सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी रविवारी याप्रकरणी आरोपीला अटक केली. तामिळनाडूतील चेंन्नई येथील रहिवासी असलेला २२ वर्षीय आरोपी वकीलीचे शिक्षण घेत आहे. तो डिजिटल मार्केटिंगशी संबंधित मुलाखतीसाठी मुंबईत आला होता. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.