प्रिया दत्त राजकारणात पुन्हा सक्रिय?
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा, भाजपच्या आमदार आशीष शेलार यांना भिडणार?
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी नुकतीच माजी खासदार प्रिया दत्त यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे प्रिया दत्त विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या शक्यतांना बळ मिळालं आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून दत्त विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभवाची धूळ चारली. हा मतदारसंघ प्रिया दत्त यांनी काही काळ राखला होता. यावेळी दत्त यांनी गायकवाडांना प्रचारात मदत केली. त्यासाठी आभार मानायला आपण गेल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
आशिष शेलार यांच्याविरुद्ध वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी प्रिया दत्त यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र या जागेवर प्रिया चांगल्या उमेदवार ठरु शकतात, असं सूचक वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं. शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा आमदार आहेत. वांद्रे पश्चिममधून लढण्यासाठी पक्षाकडे मोठा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला या विधानसभा मतदारसंघात केवळ ३६०० मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे ही जागा लढून जिंकता येण्यासारखी आहे. प्रिया दत्त यांच्याकडे दत्त कुटुंबाचा वारसा आहे. त्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांसोबतच हिंदू मतंही खेचू शकतील. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या चांगली कामगिरी करतील, असा विश्वास काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केला. वांद्रे पश्चिम भागात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असे सर्वधर्मीय मतदार आहेत. काँग्रेसकडे राहिलेला हा गड २०१४ मध्ये भाजपने जिंकला होता. आता मविआमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या एकजुटीने तो पुन्हा खेचून आणणं तितकंसं कठीण नाही. त्यामुळे प्रिया दत्त या आशिष शेलार यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरु शकतात, असं मानलं जातं.