डोंबिवलीत पतीचं संतापजनक कृत्य ;पत्नीच्या अनैतिक संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला अपलोड. मानपाडा पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे – वार्ताहर
डोंबिवली – पत्नीच्या अनैतिक संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ३५ वर्षीय महिला डोंबिवलीच्या आजदेगाव परिसरामध्ये राहते. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मागच्या काही दिवसांपासून पतीला होता. आपण कामावर गेल्यावर पत्नी काय करते? हे पतीला पाहायचं होतं, त्यामुळे त्याने घराच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले.१५ दिवसांपूर्वी पत्नीचा मित्र घरी आला आणि दोघांमध्ये शारिरिक संबंध झाले. पत्नीच्या आणि तिच्या मित्राच्या शारिरिक संबंधांचं शुटिंग छुप्या कॅमेरामध्ये झालं. महिलेच्या पतीने हा व्हिडिओ पाहिला आणि त्याचा राग अनावर झाला, यानंतर पतीचं पत्नीसोबत कडाक्याचं भांडणही झालं. पत्नी आणि तिच्या मित्राची बदनामी करण्यासाठी छुप्या कॅमेराने केलेलं शुटिंग पतीने सोशल मीडियावर अपलोड केलं. पत्नीला हे समजल्यानंतर तिने थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी पतीविरोधात विनयभंगाचा तसंच समाजात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे तपास करत आहेत.