अजित पवारांच्या सख्या भाचीच्या शोरूम मध्ये चोरी; लाखोंचा माल लंपास, तिघांच्या येरवडा पोलीसांनी आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खून, खंडणी, दहशत माजवणे, चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. आता तर चोरट्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नातीच्या शोरुमवरच डल्ला मारला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर निवेदिता साबू यांच्या कल्याणी नगरमधील शोरूमचे लॉक तोडून रोख रक्कमेसह लाखोंच्या ऐवजावार चोरट्यांनी हात साफ केला होता. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने या चोरट्यांना रांजणगाव येथून अटक केली आहे. निवेदिता साबू या शरद पवार यांच्या नात, तर अजित पवार यांच्या सख्ख्या भाची आहेत. त्यांचं कल्याणी नगर भागात कपड्यांचं शोरूम आहे. त्यांच्या या शोरूममधून चोरट्यांनी ७ ऑगस्ट रोजी ९ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती. त्यानंतर पोलिसांनी रांजणगाव येथून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
विवेक उर्फ गुरुदेव मनिराम राजपुत – ३०,अभिषेकसिंग उर्फ प्रदिप पप्पुसिंग – २५ आणि अमितसिंग विजयसिंग – ३१ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त ते रांजणगाव येथे राहण्यास आहेत. पेंटिंग तसेच सेंट्रिंगचे कामे ते करतात. कल्याणी नगर येथे ते फिरायला आले होते. त्यावेळी शोरूममध्ये रात्री उशिरा लाईट सुरू असल्याचे त्यांनी पहिले आणि त्याच वेळी त्यांनी चोरीचा डाव रचून रोकड आणि मुद्देमालावर आपला हात साफ केला. ही घटना लक्षात आल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात यासंबंधीची फिर्याद नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि आरोपी हे रांजणगावमधील संकल्प सिटी, मानवी अपार्टमेंटच्या पार्किगमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.