बहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या बापाची सावत्र मुलाने केली हत्या
टिटवाळा पोलिसांनी १२ तासाच्या आत हत्येचा छडा लावत आरोपीला ठोकल्या बेड्या.
योगेश पांडे ,/ वार्ताहर
कल्याण – बहिणीवर वाईट नजर ठेवतो म्हणून सावत्र मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कल्याणनजीक टिटवाळा परिसरातील बल्याणी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी सावत्र मुलगा कबीर सिद्दीकी आणि त्याचा मित्र अलताफ शेखला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येच्या १२ तासाच्या आतच पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे.
कादिर सिद्धकी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कादिर सिद्दीकी याची रविवारी रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्याने काही वर्षापूर्वी वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेस पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि मुलगी आहेत. अचानक कादिरची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तपास सुरु केला. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी १२ तासाच्या आत आरोपीला शोधून काढले.
कादिर सिद्दीकी याची हत्या त्याच्या सावत्र मुलगा कबीर याने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या हत्येमध्ये कबीरचा मित्र अलताफ शेख हा देखील सहभागी होता. कादिर याचा सावत्र मुलगा कबीरचा संशय होता की, कादिर त्याच्या बहिणीवर वाईट नजर ठेवून आहे. त्यामुळे त्याचा कादिरवर राग होता. या रागातूनच त्याचा काटा काढायचा कबीरने ठरवलं होतं. यातूनच कबीरने कादिरची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.