मुंबई पोलिस दलात लवकरच ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (अश्व दल) होणार दाखल

Spread the love

मुंबई पोलिस दलात लवकरच ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (अश्व दल) होणार दाखल

मुंबईतील समुद्र किनारे तसेच गरज पडल्यास गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिस घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील. राज्य सरकारकडून ३६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई पोलिस आता ठिकठिकाणी घोड्यावरून गस्त घालताना दिसणार आहेत. यासाठी राज्य सरकारने पोलिसांना ३६ कोटी रुपयांच्या निधीचे बळ दिले आहे. पोलिसांसाठी तीस तरणेबांड, सुदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त असा तबेला उभारण्यात येत असून, पोलिसांना घोडेस्वारीच्या प्रशिक्षणाबरोबरच घोड्यांचा आहार, निगा राखण्याचे धडे दिले जात आहेत. सरकारने निधीचे बळ दिल्याने मुंबई पोलिस दलात लवकरच ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (अश्व दल) नव्याने सुरू होणार आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबईत पोलिसांचे अश्व दल कार्यरत होते. ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सन २०१८-२०१९ मध्ये झाला. जानेवारी, २०२० मध्ये प्रत्यक्षात दलाची उभारणी होऊन १३ घोड्यांची खरेदी करण्यात आली. कमी निधीमुळे रेसकोर्समधून निवृत्त झालेले, जास्त वयाचे घोडे खरेदी करण्यात आले. मात्र, घोड्यांची खरेदी, तबेल्यासाठीच्या जागेचा प्रश्न, आहाराकडे दुर्लक्ष आणि पुरेशा निधीची वानवा यामुळे समस्या निर्माण झाली. या काळात सहा घोड्यांचा मृत्यू झाला; तर पाच घोडे नाशिक प्रशिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. सध्या दोन घोडे पोलिसांकडे असले, तरी गस्तीसाठी त्याचा वापर होत नाही. गुजरात, कोलकाता, केरळ, कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई पोलिसांकडेही स्वतःचे अश्व दल आहे. देशाच्या बहुतांश राज्यांतील पोलिसांकडे घोडे असून, केवळ मुंबई पोलिस त्यास अपवाद असल्याने सरकारी पातळीवर याची दखल घेण्यात आली. यामुळे आता लवकरच मुंबईतील समुद्र किनारे; तसेच गरज पडल्यास गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिस घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील.

मुंबई पोलिस दलामध्ये घोडे असावेत, अशी राजकीय इच्छाशक्ती होती; मात्र निधीअभावी अश्व दल पुन्हा सुरू करण्यात पोलिसांनी फारसा रस दाखवला नाही. हे अश्व दल चांगल्या प्रकारे आणि कायम सुरू राहावे यासाठी सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवला. सरकारने ३६ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon