मैत्रिणीला हजार रुपये देण्यासाठी तिघा युवकांनी चोरले वीजपंप; चाळीसगाव पोलिसांकडून तिघांना बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
चाळीसगाव – मैत्रिणीला एक हजार रुपये देण्यासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने अन्य दोघा मित्रांच्या मदतीने काकाच्या शेतातील इलेक्ट्रिक पंप चोरल्याची घटना चाळीसगाव पोलिसांनी उघडकीस आणली. तिघा तरुणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणा-या संशयित तीन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. त्यातील एकाने त्याच्या काकाच्या शेतातून हि मोटार चोरल्याचे सांगितले आहे. अटकेतील तिघांविरुध्द रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३० जुलै रोजी त्यांचे सहकारी गस्तीवर कार्यरत होते. पोलिस उप निरीक्षक योगेश माळी, पो.हे.कॉ. रवी पाटील, दीपक पाटील, प्रवीण जाधव, पो.कॉ. अमोल भोसले, गणेश कुवर, गोपाल पाटील असे सर्वजण घाटरोड परिसरात गस्तीवर होते. दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांना तिघे इसम मोटार सायकलवर इलेक्ट्रीक मोटार पंप घेऊन जातांना दिसले. त्यांच्या हालचाली बघता पथकाला तिघांवर संशय आला. तिघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता इलेक्ट्रीक मोटार पंप चोरीचा गुन्हा उघड झाला. त्यांच्या ताब्यातील चोरीची मोटरपंप व गुन्ह्यात त्यांनी वापरलेली मोटर सायकल असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांपैकी एकाने त्याच्या काकाच्या शेतातून ही मोटार चोरी केल्याचे कबुल केले. एकाने त्याच्या मैत्रीणीला एक हजार रुपये द्यायचे असल्यामुळे या चोरीत सहभाग घेतल्याचे कबुल केले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.