अक्कलकुवाचे बी.डी.ओ.सह लेखाधिकाऱ्याला २६ हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
नंदुरबार – अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह सहाय्यक लेखाधिकाऱ्याला अंगणवाडी बांधकामाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी २६ हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदाराने अक्कलकुवा व डाब ग्रामपंचायत अंतर्गत तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले होते. बांधकाम बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यातील एक बिल काढण्यात आले. मात्र, उर्वरित बिलाची रक्कम तक्रारदाराच्या खात्यावर वर्ग झाली नाही.
तक्रारदाराकडून बिल काढून देण्यासाठी गट विकास अधिकारी यांचे १६ हजार आणि सहाय्यक लेखाधिकारी यांचे ८ हजार मिळून २६ हजारांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार विभागाने सापळा रचून अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांना तक्रारदाराकडून १६ हजार रुपये तसेच सहाय्यक लेखाधिकारी रविंद्र सुकदेव लाडे यांना ८ हजार रुपयांची रोकड स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी यांनी सापळा लावून दोघांना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई पोलीस हवलदार विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, हेमंतकुमार महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले यांनी केली.