विशाळगड अतिक्रमण वाद : संभाजीराजेंसह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल, २१ जण पोलिसांच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
कोल्हापूर – विशाळगडाजवळील गजापूर येथे दगडफेक व जाळपोळ केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनीसुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी संघटनांनी विशाळगडाजवळील गजापूर येथे दगडफेक व जाळपोळ करत अनेक घरांचे तसेच वाहनांचे नुकसान केले. या तोडफोड केल्याप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे बेकायदेशीर जमाव जमवणेआणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी या सर्व जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या १० हूनअधिक कलमांतर्गत शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाळगड व गजापूर परिसरात रविवारी जमावाने काही घरांची, वाहनांची तोडफोड केली होती. अनेक घरांना आगी लावल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईला सुरूवात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संभाजीराजे छत्रपतींसह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कोल्हापूरसह इचलकरंजीतील अनेक जणांचा समावेश आहे. या प्रकरणात अजूनही काही जणांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सहा पथकं विशाळगडावर दाखल झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कंत्राटदारांमार्फत पथके तयार करण्यात आली आहेत. आजपासून विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात झाली आहे.