कल्याणमधील शंभर फुटी चौक परिसरात भर दिवसा भर रस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेत भर दिवसा भर रस्त्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या चौकात हत्या झाली तो चौक अतिशय रहदारीचा चौक आहे. त्या रस्त्याने हजारो गाड्या रोज ये-जा करतात. पण असं असलं तरीही या चौकात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या भयानक घटनेमुळे कल्याण पूर्वेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकी भयानक घटना घडते आणि पोलिसांना माहिती देखील मिळत नाही. हत्येनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. संबंधित घटना ही कल्याण पूर्वेच्या शंभर फुटी चौक परिसरात घडली. हा परिसरत अत्यंत रहदारीचा परिसर आहे. याच चौकाच्या बाजूला मोठमोठे हॉस्पिटल आहेत. बँक आहे, मोठं मिठाईचं, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नानाविध दुकानं आहेत. पाणीपुरीवाल्यापासून भाजीवाले यांची प्रचंड गर्दी संध्याकाळच्या सुमारास इथे बघायला मिळते. विशेष म्हणजे तीन रस्ता असल्याने इथे बऱ्याचदा प्रचंड वाहतूक कोंडी देखील झालेली बघायला मिळते. शंभर फुटी रस्त्याला लागून हायप्रोफाईल आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती आहेत. या इमारतींच्या काही अंतरावर असणाऱ्या चौकात सोमवारी एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संबंधित घटना ही सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. आरोपींनी फिल्मी स्टाईलने येत तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केला. चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झालाय. संदीप राठोड असं मृत तरुणाचे नाव आहे. तो महालक्ष्मीनगर परिसरात राहतो. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांकडून आता या हत्येप्रकरणी तपास सुरु आहे. भर चौकात हत्या झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.