धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने मुलानेच फाडले आईचे कपडे; तर भावावर कात्रीने वार
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पिंपरी-चिंचवड येथे पोटच्या पोराने दारू साठी आईने पैसे न दिल्याने तिला मारहाण करत तिचे कपडे फाडले. तर भावावर देखील जीवघेणा हल्ला केला. दारूड्या पोराने आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने आईला मारहाण करून तिचे कपडे देखील फाडले तर मध्ये पडलेल्या भावावर देखील कात्रीने वार करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटना वाकड येथे जगताप डेअरी चौक परिसरात रात्री नऊच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या मुलाला दारूचे व्यसन आहे. त्याची पीडित आई ही घरी एकटी असतांना तिच्या घरी आला. त्याने तिच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. आईने दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने तिच्यावर हल्ला केला. तिला मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्या अंगावरील कपडे देखील फाडले. तिला फरफटत घराबाहेर नेत शिवीगाळ करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. दरम्यान, यावेळी आईला मद्यपी भावाच्या तावडीतून सोडण्यासाठी मदतीला धावलेल्या मोठ्या भावावर देखील आरोपीने कात्रीने वार केले. या घटनेत भाऊ हा जखमी झाला आहे. तर शेजारील महिला देखील भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही त्याने शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली.
यानंतर आरोपी पळून गेला. तक्रारदार महिला व तिच्या मोठ्या मुलाने दवाखान्यात उपचार घेऊन थेट वाकड पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार मद्यपी मुलाचा शोध घेतला जात आहे. या साठी पथके पाठवण्यात आली आहेत असे वाकड पोलिसांनी सांगितले.