कल्याणच्या मलंगगडाची झाली असती इर्शाळवाडी? दरड कोसळता पोटच्या लेकराला वाचवण्यासाठी गमावले वडिलांनी प्राण तर आई गंभीर जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – महाराष्ट्रात इर्शाळवाडी आणि माळीण सारख्या दुर्घटना आजही आठवल्या तरी अंगाचा थरकाप उडतो. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर सकाळच्या सुमारास अशीच मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होता होता राहिली. गडावर असलेल्या घरावर दरड कोसळल्याने हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. या दुर्घटनेत आपल्या एक वर्षाच्या पोटच्या लेकराला वाचविण्यासाठी वडिलांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. झालेल्या दुर्घटनेत गुलाम बादशहा सैय्यद या ३५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून त्याची ३० वर्षीय पत्नी समीरा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मलंगगड परिसरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता. आज सकाळी ६ च्या सुमारास श्री मलंगगडाच्या उंच शिखरावरून दरड कोसळून खाली आली. निखळून आलेले मोठं मोठे दगड पायथ्याशी असलेल्या घरावर कोसळले. दरड कोसळण्याचा आवाज होताच दोन्ही पती पत्नीने आपल्या एक वर्षाच्या मुलाला कवटाळून धरले. मोठमोठ्या दगडांचे घाव झेलत पित्याने शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लेकराचा बचाव केला. यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही पती पत्नीला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता गुलाम सैय्यद यांस मृत घोषित करण्यात आले. तर एक वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.
मलंगगडावर जवळपास चारशे पाचशे कुटुंबाची लोकवस्ती आहे. आमच्या जीविताला धोका असून गडावरच सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करून द्यावे, अशी स्थानिक रहिवाश्यांसह मृतकाच्या वडिलांनी मागणी केली आहे. याचदरम्यान शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्याचबरोबर कुटुंबियांची भेट घेत शासन स्तरावर पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी मृतकाच्या कुटुंबियांना दिले. येथील स्थानिकांचे पुनर्वसन व्हावे, इर्शाळवाडीसारखी घटना पुन्हा होऊ नये यादृष्टीने प्रयत्न करून शासनाने वेळीच दखल घ्यायला हवी असे यावेळी महेश गायकवाड म्हणाले. या भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडतात तरीही नागरिक आपला जीव धोक्यात घालून याठिकाणी राहतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून डोंगर भागात वाढत असलेल्या अनधिकृत वस्तीकडे बोट दाखवत असले तरी येथील नागरिकांना वेगळाच आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी जेएनपीटी-वडोदरा महामार्गाच्या बोगद्याचे काम सुरु असताना स्फोट करण्यात आला होता. त्या स्फोटामुळे डोंगराला हादरे बसले. त्यामुळेच सोमवारी गुलाम यांच्या घरावर दरड कोसळली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.