सहा महिन्यांच्या चिमूरड्याचं अपहरण करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Spread the love

सहा महिन्यांच्या चिमूरड्याचं अपहरण करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

महात्मा फुले चौक पोलीसांकडून १२ तासाच्या आत मुलाची सुखरूप सुटका

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – भंगार गोळा करणारी महिला तिच्या ६ महिन्याच्या चिमुकल्यासह फुटपाथवर झोपली होती. याचा फायदा घेत शनिवारी रात्री तिच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीसांनी १२ तासाच्या आता मुलाचा शोध घेऊन उल्हासनगर येथून त्याची सुटका केली. चिमूकला अरबाज त्याचा आईच्या कुशीत सुखरूप पोहोचला आहे. उल्हासनगर येथील रिक्शाचालकाने या चिमुकल्याचे अपहरण का केले याचा पोलीस तपास करत आहेत. दिनेश भैयालाल सरोज (३५) व अंकित कुमार राजेन्द्रकुमार प्रजापति (२५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनेश हा रिक्शाचालक असून अंकित हा टेलरचे काम करतो. फिर्यादि महिला आयेशा शेख (२०) या कल्याण पश्चिमेलाअसलेल्या मेमोरीयल मेवेडीस्ट चर्च येथील केडीएमसी बस स्टॉप शेजारी फुटपाथवर राहतात आणि भंगार गोळा करण्याचे काम करतात. शनिवारी रात्री १ ते ४ च्या दरम्यान आयेशा या आपल्या मुलांसह झोपल्या असता त्यांच्या मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी ३ तपास पथके तयार केली होती. तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज,तांत्रिक माहिती व मिळालेल्या खत्रीशिर माहितीचे आधारे सापळा रचून दिनेश व अंकितकुमार यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याचवेळी ६ महिन्याचा अपहृत मुलगा अरबाज समीर शेख याची उल्हासनगर येथून आरोपीच्या राहत्या घरातून सुखरूप सुटका केली. रविवारी दोघांना पोलीसांनी अटक केली असून तपासात दिनेश हा रिक्शा चालवित असताना मुलाचे पालक गाढ़ झोपेत असल्याची खात्री करून त्या मुलास गुपचुप उचलून नेऊन अंकितच्या मदतीने त्याच्या राहत्या घरी ठेवले असल्याचे सांगितले. त्या प्रमाणे तापास सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक विजय नाईक करत आहेत. ६ महिन्याचा अरबाज याची १२ तासात सुखरूप सुटका करत त्याचा आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हासाठी वापरलेली रिक्शा, मोबाइल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महात्मा फुले चौक पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon