लाचखोर ग्रामविकास अधिकारी चतुर्भूज !

Spread the love

लाचखोर ग्रामविकास अधिकारी चतुर्भूज !

दत्तात्रय कराळे/परभणी

मानवत तालुक्यातील तृतीय श्रेणीतील ग्रामविकास अधिकारी मधुकर बापुराव गोरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने रुपये दहा हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.

मौजे पोहंडुळ येथील डीपीडीसीच्या निधीतून मंजूर नाली व सिमेंट रस्त्याचे काम तक्रारकर्त्याने केले होते. ५ मे रोजी त्या कामाचा धनादेश ग्रामविकास अधिकारी मधुकर गोरे यांच्याकडून तक्रारकर्त्याने स्वीकारला. तो धनादेश बँक खात्यात जमा करण्याकरीता आरटीजीएसच्या फॉर्मवर गोरे यांची शिक्क्यासह स्वाक्षरी मागितली असता गोरे यांनी संबंधितास २० हजार रुपयांची लाच मागितली. त्याशिवाय आरटीजीएसवर आपण स्वाक्षरी करणार नाही, असे नमूद केले. तक्रारकर्त्याने भितीपोटी 4 हजार रुपये गोरे यांना तात्काळ सुपूर्द केले. उर्वरीत १६ हजार रुपये आरटीजीएस फॉर्मवर सही आणि शिक्का घेतेवेळी आणून द्यावे, असे गोरे यांनी सूनावले. संबंधिताने लाच द्यावयाची इच्छा नसल्याने १३ मे रोजी परभणी येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या खात्याच्या पथकाने पंचा समक्ष पडताळणी केली. तेव्हा मधुकर गोरे यानी सही आणि शिक्का देण्याकरीता तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे या खात्याच्या पथकाने बुधवारी सकाळी पंचासमक्ष गोरे यास तक्रारकर्त्याकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे व पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सदानंद वाघमारे व अन्य अधिकारी कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon