कल्याणमधील विश्वास ढाबाच्या मालकावर धारदार शस्त्राने वार, कोळसेवाड़ी पोलीसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Spread the love

कल्याणमधील विश्वास ढाबाच्या मालकावर धारदार शस्त्राने वार, कोळसेवाड़ी पोलीसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – जेवणाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून ढाबा चालकावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व भागातील विश्वास ढाब्यावरील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व परिसरामध्ये असणाऱ्या विश्वास ढाब्यावर चार तरुण दोन दिवसांपूर्वी जेवण्यासाठी गेले होते. पण येथे न जेवता त्यांनी पार्सल घेतले. ढाबा मालक विश्वास जोशी यांनी चार तरुणांपैकी एकाला बिलाचे पैसे देण्यास सांगितले, त्यावेळेस त्यानं नकार दिला. मजहर शेख असे या तरुणाचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. पैशांची मागणी करताच मजहर शेखने म्हटले की आम्ही भाई लोक आहोत. आम्ही कुठेही पैसे देत नाही. यावर “दादागिरी करू नका, बिल द्या. नाहीतर पार्सल घेऊन जाऊ नका”,असे जोशींनी ठणकावून सांगितले.

यावरुन मजहर शेख, कुणाल गायकवाड, हरिश मजहर आणि शुभम देवमनी यांनी विश्वास जोशींसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मजहरने कमरेला लावलेला धारदार चॉपर बाहेर काढला आणि विश्वास यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस घटनास्थळी विश्वास यांचे भाऊ गणेश देखील होते. प्रसंगावधान दाखवत गणेश यांनी चॉपर अडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गणेश यांच्या चार बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रियाही करण्यात आली. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कदम यांनी पोलीस अधिकारी दिगंबर पवारांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार केले. या पथकाने चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चौघे आरोपी बेरोजगार आहेत. यापैकी मजहर शेखविरोधात काही गुन्हे देखील दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले की,”ढाब्यावर पार्सलचे बिल भरण्यावरून भांडण झाले. त्यामध्ये सराईत आरोपी मझहर शेख आणि त्यांच्या साथीदारांनी ढाबा चालकाला मारहाण केली. या मारहाणीत गणेश जोशी नावाचा व्यक्ती जखमी झाला, हल्ल्यात त्याची बोट छाटली गेली आहेत. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी मझहर शेखविरोधात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास करण्यात येत आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon