दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौकडीला पोलिसांनी केले जेरबंद; हत्यारे व मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – अनंत हलवाई जवळील झुंझारराव मार्केट येथे दरोड्याचा तयारीत असलेल्या चौकडीला महात्मा फुले चौक पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारी ही टोळी कल्याणमधील झुंझारराव मार्केटमधील एका दुकानात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस हवालदार चौधरी व त्यांच्या पथकाने पोलिसांनी शुक्रवार दि ३० मे रोजी पहाटे पोलिसांनी सापळा रचून चार तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत असलेला एक तरुण संधीचा फायदा घेत पसार झाला. या टोळीकडून चाकू, लोखंडी कटावणी, मिरची पूड, पक्कड, पांढऱ्या धातूचे फायटर, हातोडा व रोख रक्कम व प्राणघातक अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं. | ५६८/२०२४, भा.द.वि. कलम ३९९, ४०२, ३९८ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकूळ पंडित सोनावणे, वय- ३७, रा. कल्याण पूर्व, उमेश बैजनाथ सिंह,वय- ४८, रा. कल्याण रेल्वे स्टेशन फिरस्ता, बुखन कुमार श्रीगोना यादव, वय-२०, रा. बदलापूर व मुशेद जावेद खान, वय- ३२, रा. कल्याण रेल्वे स्टेशन फिरस्ता अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांपैकी गोकूळ आणि उमेशच्या विरोधात या आधी देखील चोरी आणि लूटीचे गुन्हे दाखल आहेत हे पाच जण रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानकात येणारे जाणाऱ्यांना गाठतात. त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेत असत. अनेकदा प्रवासी या प्रकरणात तक्रार करत नाहीत याचा फायदा हे घेत होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली असून पाचवा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी सांगितले आहे.