भिवंडीत ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर गोंधळ, टेम्पोमधून आणलेल्या कम्प्युटरवर कार्यकर्त्यांचा आक्षेप तर प्रशासन अनभिज्ञ

Spread the love

भिवंडीत ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर गोंधळ, टेम्पोमधून आणलेल्या कम्प्युटरवर कार्यकर्त्यांचा आक्षेप तर प्रशासन अनभिज्ञ

स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा आणखी वाढविण्याची बाळ्या मामा यांची मागणी

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आला असून त्यासंबंधित आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशिन ठेवले आहेत त्या स्ट्राँग रूमला पोलिसांसोबतच त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही संरक्षण दिल्याचं दिसून आलंय. पण त्यातूनही काही प्रमाणात गोंधळ उडाल्याचं दिसतंय. भिवंडीत असाच काहीसा प्रकार घडला. ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये एक टेम्पो आला आणि त्यातून जुने कम्प्युटर आत नेत असल्याचं लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. महत्त्वाचं म्हणजे हे कम्प्युटर आत का नेले जात होते याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही नसल्याचं उघड झालं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. निवडणुकीनंतर संपूर्ण ईव्हीएम मशीन भिवंडी तालुक्यातील सावद येथील केयूडी बिजनेस क्लस्टर पार्कमधील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडून चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. मात्र शुक्रवारी सायंकाळी स्ट्राँग रूमबाहेर जुन्या टेम्पोतून दहा ते बारा जुने कम्प्युटर स्ट्राँग रूमच्या आतमध्ये नेत असल्याचं दिसून आलं.

सदरचा कम्प्युटर भरलेला टेम्पो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्ट्राँग रूम बाहेर जागता पहारा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी अडवलेल्याने स्ट्राँग रूम बाहेर एकच गोंधळ उडाला होता. या टेम्पो चालकाकडून कम्प्युटर आत मध्ये नेण्यासाठीचा कोणताही परवाना नसल्याने कम्प्युटर संदर्भातील संशय अधिक बळाल्याने कार्यकर्त्यांनी टेम्पो गेटवरच अडवून धरला होता. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भेट देऊन कम्प्युटर आणि स्ट्राँगरूम बाहेरची पाहणी केली. याठिकाणी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे, भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजीत खोले यांच्यासह शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील स्ट्राँग रूमची देखील पाहणी केली.

गेटवर आलेल्या जुन्या कम्प्युटरबद्दल जिल्हाधिकारी शिनगारे यांना विचारणा केली असता याबद्दल माहिती नसल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. स्ट्राँग रूम बाहेर शासकीय यंत्रणेने चोख सुरक्षा ठेवावी तसेच कोणतेही कंप्युटर अथवा साहित्य स्ट्राँग रूमच्या आत मध्ये जात असल्यास त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या व पत्रक असेल तरच कम्प्युटर अथवा इतर साहित्य स्ट्राँग रूममध्ये नेण्यास परवानगी द्यावी अशा प्रकारची लेखी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon