गायमुख घाटातील रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणमुळे घोडबंदर रोडवर २४ मे ते ६ जून दरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जणार आहे. या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम शुक्रवार २४ मे पासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलं आहे. याच कारणामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या मार्गावर ६ जूनपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दुरुस्तीच्या कमांचा अवाका पाहता पुढील काही दिवस ठाणे, घोडबंदर, मुंबई-अहमदाबाद मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घोडबंदर रोड हा राज्याबाहेर रस्ते मार्गाने माल वाहून नेणाऱ्या ट्रकसाठी प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरणमधील जेएनपीटी बंदरातून गुजरात मार्गावर माल वाहून नेणारी हजारो वाहने घोडबंदर रोडवरुन जातात. अवजड वाहनांबरोबरच मुंबई, वसई, विरार, भाईंदरमधील छोट्या वाहनांकडूनही मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर केला जातो. बोरीवली, मिरा-भाईंदरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाबरोबरच नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसही याच मार्गाने जातात. त्यामुळे या मार्गावरुन प्रवाशांची ये-जा सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.
२४ मे ते ६ जूनदरम्यान या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असली तरी हलक्या वाहनांची वाहतूक मार्गावरून सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दुरुस्ती सुरु असतानाही येथील वाहतूक सिंगल लेन पद्धतीने सोडली जाण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्गावरील घाटाजवळचा रस्ता हा अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे एकाचवेळी अवजड वाहने आणि हलक्या वाहनांचा भार वाढल्यास ठाणे, घोडबंदर आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांच्या रांगा लागू शकतात.