भिवंडीत भेसळ मसाल्यांचा माल जप्त, दोघांना शांतीनगर पोलीसांकडून अटक

Spread the love

भिवंडीत भेसळ मसाल्यांचा माल जप्त, दोघांना शांतीनगर पोलीसांकडून अटक

सुरतच्या फॅक्टरीमध्ये माल बनवून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश मध्ये विक्री

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या गरीब नागरिकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन मोठया प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री केल्याच्या तक्रारी वाढत आहे. मागील चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटक केल्यानंतर आता बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून १ लाख ८ हजार रुपये किमतीचा बनावट मसाल्याचे पाकीट जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे व पोलिस पथकाने जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा रचत ही कारवाई केली. जोगेश्वरी येथून आलेला एक संशयित टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये १ लाख ८ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला,एव्हरेस्ट मटण मसाला आणि मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले.

टेम्पो चालक महेश लालताप्रसाद यादव आणि माल विक्रीसाठी आलेला मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीत हे बनावट पॅकिंग माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांत विक्री केला जात असल्याचे समजले. पोलिस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी, पर्वतगाव येथे छापा टाकला. करण सुरेशभाई मेवाड हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिस पथकाने तेथील कच्चा माल आणि मशीन व फॅक्टरी सील करून कारवाई केली आहे. खऱ्या एव्हरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो,परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून त्यामुळे एव्हरेस्ट कंपनीच्या सेल्समन यांनी दिलेल्या तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी सुद्धा आपण वापरत असलेले पॅक बंद खाद्य पदार्थ खरेदी करीत असताना त्याच्या खरे पणाची खात्री करून घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon