इंदापूरच्या तहसीलदारावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने हल्ला करत मिरचीची पूडही टाकली
पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरु, खासदार सुप्रिया सुळे यांची गृहखात्यावर टीका
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या शासकीय गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांच्यावर मिरचीची पूडही टाकली गेली आहे. या हल्ल्यात श्रीकांत पाटील बचावले आहे. या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आलेले आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी संविधान चौकात हा हल्ला केला. शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. इंदापूर शहरातील संविधान चौकात तहसीलदारांची गाडी आली असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. सोबत हल्लेखोरांनी मिरचीची पूड देखील आणली होती. ती देखील डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तहसीलदार श्रीकांत पाटील यांचमया गाडीच्या काचा फुटल्या. सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत. या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून इंदापूर तालुक्याच्या चोहोबाजूने नाकाबंदी करण्यात आलेले आहे.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही.