धक्कादायक ! पुण्यात महिलेकडे शरीर सुखाची व खंडणीची मागणी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
पुणे – पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. विद्येचे माहेरघर अनेक गैरकृत्याने बदनाम होत आहे. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. पुण्यात महिलेकडे शरीर संबंधाची मागणी करुन मारहाण करत अंगावरील कपडे फाडून खंडणीची मागणी केली तसेच फेसबुकवर फोटो अपलोड करुन अश्लिल मेसेज लिहून बदनामी केल्याप्रकरणी एकावर भारती विद्यापीठ पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ मे रोजी सायंकाळी याबाबत ४५ वर्षीय महिलेने रविवारी (दि.१९) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन महादेव सिताराम सुरवसे (रा. जुना बाजार जवळ, बीड) याच्यावर भा.द. वि. कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३५४(ड), ३२३, ५०६, ३८५ सह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाजी घेण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी यांचे केस पकडून तू माझे फोन का उचलत नाही, मला का भेट नाही असे म्हणून शरीर संबंधाची मागणी केली असता महिलेने त्याला नकार दिला त्यावरून त्याने हाताने मारहाण करुन फिर्यादी यांच्या अंगावरी कपडे फाडून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच त्याच्या फेसबुक अकाउंटवर फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीचा एकत्रीत फोटो अपलोड केला. फोटो अपलोड करताना त्याने अश्लिल मेसेज लिहून फिर्यादी यांची बदनामी केली. यानंतर आरोपी महादेव सुरवसे याने महिलेच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करुन २७०० रुपये पाठवण्यास सांगितले.
पैसे दिले नाही तर जगू देणार नाही अशी धमकी दिली तसेच पैशासाठी त्रास देण्याची धमकी दिली. पतीकडून पैसे वसूल करुन बीडला जाईन असा मेसेज करुन पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झीने करीत आहेत.