जेट एअरवेजचे प्रमुख नरेश गोयल यांच्या पत्नीचं निधन, काही दिवसांपूर्वीच मिळाला होता जामीन
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं गुरुवारी पहाटे मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्या कॅन्सरनं आजारी होत्या. अनिता यांच्या पश्चात पती, नम्रता आणि निवान ही दोन मुले असा परिवार आहे.
गोयल कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार, पहाटे तीनच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव रुग्णालयातून घरी आणलं जाणार आहे व त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नरेश गोयल हे सध्या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आहेत. अनिता गोयल यांचे पती नरेश गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानं वैद्यकीय कारणास्तव या दाम्पत्याला अलीकडंच दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. उपचार सुरू असतानाही गेल्या काही महिन्यांपासून अनिता यांची तब्येत खालावली होती. ७५ वर्षीय नरेश गोयल हे देखील कर्करोगाशी झुंज देत आहेत.
गोयल यांनी आपले वकील हरीश साळवे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. गोयल हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अडचणीत आहेत. त्यांना पत्नीच्या आजारपणात तिला आधार द्यायचा होता. गोयल यांनी पत्नीबरोबर राहण्यासाठी शस्त्रक्रियेऐवजी केमोथेरपीचा पर्याय निवडला होता. ईडीच्या म्हणण्यानुसार, जेट एअरवेजनं आपल्या दैनंदिन खर्चासाठी १० बँकांच्या समूहाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र, अद्यापही या बँकांचं सहा हजार कोटी रुपये थकीत आहेत. ईडीच्या माहितीनुसार, एअरलाइन्सनं सुमारे १,१५२ कोटी रुपये कन्सल्टन्सी आणि व्यावसायिक शुल्काच्या नावाखाली वळवले आहेत आणि २५४७.८३ कोटी रुपये जेट लाइट लिमिटेड या उप कंपनीचं कर्ज फेडण्यासाठी वळविण्यात आले आहेत.
सप्टेंबर २०२३ मध्ये ईडीनं गोयल यांना अटक केली होती. कॅनरा बँकेनं जेट एअरवेजला दिलेल्या ५३८.६२ कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. नरेश गोयल यांच्या पाठोपाठ अनिता गोयल यांनाही याच प्रकरणात नोव्हेंबर २०२३ मध्ये अटक झाली होती. मात्र त्यांचं वय आणि प्रकृती पाहून त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला होता.