१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३३ वर्षीय आरोपीस कोळसेवाडी पोलीसांकडून अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका गृहसंंकुलात शुक्रवारी रात्री एका इसमाने या भागात राहत असलेल्या एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी या इसमा विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. महेश मारूती चव्हाण, (३३) असे आरोपीचे नाव आहे. काटेमानिवली भागातील एक मुलगी आपल्या भावासह दररोज राहत असलेल्या गृहसंकुलाच्या आवारात सायकल चालविण्यासाठी येते. नेहमीप्रमाणे सायकल चालवित असताना शुक्रवारी रात्री आरोपी महेश चव्हाण याने सायकल चालविणाऱ्या मुलीला तू किती वाजता दररोज सायकल चालविण्यासाठी इमारतीच्या आवारात येते,अशी विचारणा केली. नेहमी दिसणारे काका आपल्याला विचारणा करतात म्हणून मुलीने भोळेपणाने आपण दररोज नऊ वाजता घरातून खाली येतो असे सांगितले. यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला बोलत बोलत गृहसंकुलाच्या जिन्यापर्यंत नेले. नंतर आरोपी महेशने मुलीला काही कळण्याच्या आत तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरुन ती रडायला लागली.
हा प्रकार मुलीने आपल्या आईला सांंगितला. सोसायटी सदस्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर या प्रकराबद्दल आरोपी महेश विरुध्द पीडित मुलीच्या आईने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.