वायुसेनेच्या वाहनाच्या धडकेमुळे सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – कोलशेत येथील वायु दलाच्या प्रवेशद्वारावर लष्कर अभियंता सेवेच्या वाहन प्रवेशद्वाराला धडकून त्या प्रवेशद्वाराचा धक्का लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. रोशन झा – २४ असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलशेत येथे वायु दलाचे तळ आहे. कोलशेत वरचा गाव भागात राहणारा रोशन झा मागील वर्षभरापासून वायुदलाच्या प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास रोशन झा हे प्रवेशद्वारावर कार्यरत असताना लष्कर अभियंता सेवेचे वाहन त्याठिकाणी आले. त्यावेळी वाहनाची येथील प्रवेशद्वाराला जोरदार धडक बसली. त्यामुळे प्रवेशद्वाराचा रोशन यांच्या डोक्याला धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.