पुण्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक, कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – राज्यात ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असून सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ होत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची दोघांनी आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात हेलपाटे मारण्याची वेळ संबंधित व्यक्तीवर आली. या व्यक्तीचा अपघात झाल्याने त्यांना दिव्यांगत्व आले आहे. त्यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार अर्ज करुन देखील पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी अरेरावी करुन गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ केल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला आहे.
याप्रकरणी या व्यक्तीने पोलीस उपायक्तांसह विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. जावेद इनामदार (रा. कोंढवा) यांची दोघांनी सहा लाखांची फसवणूक केली. इनामदार हे राज्य सरकारच्या ग्रामीण विकास विभागात वरिष्ठ अधिकारी पदावरुन निवृत्त झाले. कर्तव्यावर असताना त्यांचा रस्ते अपघात होऊन त्यांना अपंगत्व आले. निवृत्तीनंतर पीएफ व इतर माध्यमातून मिळालेले एकूण सहा लाख रुपये दोघांकडे गुंतवले. मात्र, त्यांनी परतावा अथवा पैसे न देता फसवणूक केली. त्यामुळे इनामदार यांनी २२ डिसेंबर २०२३ रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.
कोंढवा पोलिसांनी तक्रार अर्जावर कार्यवाही करताना सुरुवातीला तक्रारदार किंवा आरोपींचा जबाब घेतला नाही. त्यामुळे इनामदार यांनी तपास अधिकारी बदलून मिळण्याची मागणी वरिष्ठ पोलिसांकडे केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये जबाब नोंदवून घेतला मात्र जबाबची प्रत दिली नाही. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला असता, चांगली वागणूक देण्यात आली नाही, असा आरोप इनामदार यांनी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे म्हणाले,
संबंधित तक्रारदारकडून तक्रर अर्ज प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना मदत करण्याच्या भावनेने आम्ही फसवणूक करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. तक्रारदार व आरोपींना समोरासमोर बसवून त्यांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वस्त केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.तरी सुद्धा इनामदार यांचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही.