मद्याच्या बाटल्या चोरून विकणाऱ्या चार जणांना केले जेरबंद; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

मद्याच्या बाटल्या चोरून विकणाऱ्या चार जणांना केले जेरबंद; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर 

कल्याण – कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील जी. के. वाईन्स या मद्य विक्री दुकानातील महागड्या मद्याच्या बाटल्या चोरून बाहेर मध्यस्थांच्या मार्फत ढाब्यांना विकून पैसे कमविणाऱ्या चार जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. यामध्ये दुकानातील एका कामगाराचा सहभाग आढळून आला आहे. सुनील प्रकाश कुंदल, सुरेश प्रीतम पाचरणे – २४, नरेश राघो भोईर – ३९, सागर श्रावण पाटील – २४,अशी अटक आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडून २१ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कल्याण गु्न्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांंनी सांंगितले, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथे अनिलकुमार भगवानदास बजाज यांचे मद्य विक्रीचे अधिकृत दुकान आहे. या दुकानातून गेल्या महिन्यांच्या कालावधीत एक ते दोन मद्याच्या बाटल्या अशा पद्धतीने एकूण सहा लाख ४० हजार रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या चोरीला गेल्या होत्या. या बाटल्या दुकानातील कामगार सुनील कुंंदल याने चोरून नेल्याचे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी दुकानदार अनिलकुमार बजाज यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कामगार सुनील याच्यासह इतर आरोपी फरार झाले होते. कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार गोरक्ष शेकडे यांना मद्य विक्रीतील एक आरोपी सुनील उल्हासनगर येथे येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ताराम भोसले, गोरक्ष शेडगे, गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विलास कडू, दीपक महाजन, चालक अमोल बोरकर यांच्या पथकाने शनिवारी उल्हासनगर परिसरात सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी सुनील त्या भागात येताच पोलिसांनी झडप घालून त्याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासात सुनीलने जी.के. वाईन्स दुकानातून चोरून नेलेल्या महागड्या मद्याच्या बाटल्या आरोपींनी संगनमताने कल्याण, डोंंबिवली परिसरातील ढाबे मालकांना विकल्या आहेत. पोलिसांनी इतर आरोपींंचा शोध घेऊन त्यांना अंबरनाथ, उल्हासनगर भागातून तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली.

या मद्याच्या बाटल्या खरेदी करणाऱ्या ढाबे चालकांची पोलीस चौकश करणार आहेत. त्यामुळे ढाबे चालक या प्रकरणात अडचणीत येण्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. कल्याण, डोंबिवली परिसरात एकूण ३५० ढाबे आहेत. एकाही ढाबे मालकाकडे पालिका, शासनाचे व्यवसाय करण्याचे नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon