आयपीएल क्रिकेटवर बेटिंगं लावणाऱ्या १० जणांना पोलिसांनी केले जेरबंद

Spread the love

आयपीएल क्रिकेटवर बेटिंगं लावणाऱ्या १० जणांना पोलिसांनी केले जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

वाकड – आयपीएलमधील गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यावर बेटिंगचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला आहे. वाकड पोलिसांनी गुरुवारी रात्री ११ वा.च्या सुमारास कारवाई करून  १० संशयितांना अटक केली.

सूर्यप्रताप कौशल्य सिंग (वय १८), राजेश छोटेलाल कुराबहू (२५), शुभम पुलसी धरू (२२), तिलेश अमितकुमार कुरेह (२५), जितू नवीन हरपाल (२८), राहुलकुमार प्रकाश कुमार उराव (२२), यश प्रसाद शाहू (१८), किशन मनोज पोपटानी (२२), समया सुखदास महंत (२६, सर्व रा. छत्तीसगढ), रणजित सरजू मुखीया (२०, रा. पुनद, ता. घनशामपूर, जि. दरभंगा, बिहार), कार्तिक उर्फ दिनेश आहुजा (रा. नागपूर), रामू बोमन (छत्तीसगढ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस नाईक सुनील काटे यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ५) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग लावणाऱ्यांची माहिती काढून कारवाई केली जात आहे. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मिलेनियम मॉलच्या समोरील बी बिल्डींग मधील फ्लॅट नं. ११०१ मध्ये आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. आरोपी आयपीएल सामन्यातील गुजरात विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब मध्ये सुरु असलेल्या टी-२० सामन्यावर वेगवेगळे बेटिंग अँपद्वारे सट्टा खेळत असताना आढळून आले.

तसेच आरोपी कार्तिक आहुजा व रामू बोमन यांनी क्रिकेट बेटिंगसाठी ग्राहकांकडून हार जित होणाऱ्या रक्कमेचा व्यवहार देवाण घेवाण करण्यासाठी इतरांच्या नावाने बँक खाते उघडल्याचे समोर आले. आरोपींनी बँक खात्यांचा वापर क्रिकेट बेटिंगसाठी करत असल्याचे निष्पन्न झाले. वाकड पोलिसांनी या कारवाईत ६ लाख ५८ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon