येत्या आठवड्यात ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात प्रवेश करतील; एकनाथ खड़से सुद्धा शरद पवारांना सोडून भाजप मध्ये परत येणार – संजय शिरसाट
योगेश पांडे /वार्ताहर
मुंबई – येत्या एक आठवड्यात अनेक घडामोडी घडतील, असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे गटाच्या काही आमदारांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असं ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केली. इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात, त्यावर आग्रही भूमिका मांडली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली. ते पुढे म्हणाले कि मित्र पक्षाचे कार्यकर्ये आपल्यासोबत किंवा आपण त्यांच्यासोबत कसे रहावे यावर चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी विंग तयार केली आहे. तीनही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठीची आहे, जी जिंकायची आहे.
युतीत काही जागांवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. यातच काही नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तर काही नेत्यांचं तिकीट अद्याप जाहीर न झाल्याने ते नाराज आहेत. याचबद्दल त्यांना विचारलं असतं ते म्हणाले आहेत की, थोड्या कुरघोड्या असतात. पण शिंदे साहेबांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा होइल. तुमची मागणीवर चर्चा होइल. युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात, तेव्हा काही शेअर द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, खडसेंना जाणीव झाली असेल की, आपला पक्ष हा आपला आहे. आता भाजपने त्यांच कसं स्वागत करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते आले तर फायदाच होईल.