साताऱ्यात घरफोडीचे २६ गुन्हे उघडकीस; ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
सातारा – सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पाच चोरट्यांकडून जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली रोकड आणि दागिने, असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये २ लाख ४० हजार रूपयांची रोडक आणि ५६ तोळ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.
सुनील ऊर्फ सुशील बबन भोसले (रा. रामनगर, कटकेवाडी, पो. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे), रोहन बिरू सोनटक्के (रा. मुरूम, उमरगा, जि. अहमदनगर), महेंद्र रामाभाई राठोड (रा. कुसेगाव, दाैंड, ता. पुणे), संदीप झुंबर भोसले (रा. वाघोली, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेली माहिती अशी की, खेड (ता. सातारा) येथील एका घरातून १३ मार्च रोजी तब्बल २९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे ९ लाख २९ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारानंतर पोलिस निरीक्षक अरुण देवकर व त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आजूबाजूच्या लोकांकडे माहिती घेतली तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे ही घरफोडी सराईत आरोपी सुनील भोसले याने केल्याचे समोर आले. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित फर्णे आणि विश्वास शिंगाडे यांची दोन पथके तयार करण्यात आली. या पथकाने पाळत ठेवून सुनील भोसले याला साताऱ्यातून अटक केली. त्याने एकट्याने १२ घरफोडीचे व २ चोरीचे, असे एकूण १४ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे १३ लाख १९ हजार ९०० रुपयांचे १९ तोळ्यांचे दागिने आणि एक बोल्ट कटर, स्क्रू ड्रायव्हर असे साहित्यही हस्तगत केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांच्यासह वेगवेगवेळी तपास पथके तयार करून गुन्ह्याचा तपास करण्याचा आदेश दिला होता.