सातबारा नोंदीसाठी लाच मागणाऱ्या मध्यस्थावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडे ८० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी थेऊरमधील मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने कोलवडी (ता. हवेली) येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याची नोंद व फेरफार मंजूर करण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकारी यांच्याकरीता खाजगी इसम विजय नाईकनवरे याने ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता,त्यात तत्थ्य आढळल्याने विजय नाईकनवरे याच्यावर दुसरा लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत