लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नवी भूमिका
प्रकाश आंबेडकरांच्या नव्या भूमिकेने महाविकास आघाडी आणि महायुतीचं वाढवलं टेन्शन
योगेश पांडे / वार्ताहर
नागपुर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने नवी भूमिका मांडली आहे. आमची संकल्पना महाविकास आघाडीला मान्य झाली नाही. त्यांचं भांडणही मिटलं नाही. यामुळे या निवडणुकीत आम्ही आघाडी म्हणून उभं राहत आहोत. राज्यातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार हे जाहीर करत आहोत, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे रविवारी नागूपर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत समझोता नाही हे आम्ही सांगतो होतो. ते आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे यादी जाहीर होत नाही. या तिन्ही पक्षांच्या वेगळवेगळ्या याद्या बाहेर पडताना दिसत आहेत. ते मैत्रीपूर्ण अशा पद्धतीची संकल्पना मांडत आहेत. आम्हाला हे अगोदर माहीत होतं. यामुळे आम्ही त्यांना पहिलं तुम्हीच वाद मिटवा म्हटलं.
महाविकास आघाडीचं भांडण मिटत नसल्यामुळे ते आम्हाला कोणत्या जागा लढायला पाहिजे, ते सांगत नाही. आम्ही महाविकास आघाडीत गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता. आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पाठिंबा देत असल्याचा त्यांना सांगितलं, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत एकाच विचारांची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढत आहे. १४ ते १६ मतदारसंघांमध्ये अशी परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी मागील काळात पक्ष लढलेले आहे. त्यांचं त्याच ठिकाणी अस्तित्व आहे. जिथे लढलेली नाही, तिथे त्यांचं अस्तित्व नाही. शिवसेना आणि भाजपमधून दिसले आहे. भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या लोकांना घेण्याची गरज काय, खरंतर त्यांची सुद्धा तशीच परिस्थिती आहे, असेही पुढे त्यांनी सांगितलं.
भाजप ज्या मतदारसंघात लढलेला आहे, तिथे त्यांचं प्राबल्य आहे. मात्र, जिथे भाजप लढलेले नाही. तिथे त्यांचा प्राबल्य नाही. ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून काही पक्ष फोडण्याचा काम झालं. मनसेला सुद्धा भाजप स्वतःच्या पक्षांमध्ये सोबत घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, असे आंबेडकरांनी सांगितलं.