वर्सोव्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Spread the love

वर्सोव्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

४ आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार ; एकूण १,५५,४००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईतील वर्सोव्यात गुरुवारी सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. दरोड्याच्या तयारीत असलेल्या ४ आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विनोद किशोर वैष्णव (३३), पिंटू कमलेश चौधरी (३२),अशफाक अब्दुल रशीद सयद (३३) आणि चांद इब्राहीम शेख (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तल, तीन राउंड, दोन मो/सायकल असे एकूण १,५५,४००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर शंकर चौरशिया (वडाळा) हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला येथील बोनबोन लेन परिसरात ४ ते ५ व्यक्ती सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच झोन ९ चे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन आणि वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला बांधवान परिसरात असणाऱ्या ॲक्सिस बँक व अमित ज्वेलर परिसरात सापळा रचला. यावेळी पोलिसांना ४ ते ५ व्यक्ती संशयास्पद हालचाल करताना दिसून आले. त्यांना पोलिसांनी हटकले असता, आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठ्या फिल्मी स्टाईलने त्यांचा पाठलाग करून ४ आरोपींना अटक केली. तर एकजण पळून जाण्यास यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर वर्सोवा पोलीस ठाण्यात कलम ३९९,४०२, भा.द.वि. सह कलम ३,४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम १२४,३७(१),१३५ मपोका १९५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीकडून एक देशी बनावटीची पिस्तल, तीन राउंड, दोन मोटार सायकल व इतर साहित्य असे एकूण १,५५,४००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon