विरारमध्ये ४० वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या ; आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
विरार – विरार पूर्वेच्या नारंगी कोपरी कच्ची खदान रोडवर एका ४० वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपक उमेश चव्हाण असं हत्या झालेल्या इसमाचे नाव असून तो मुंबईच्या मालाड परिसरात सुतार काम करत असल्याचे समजते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेच्या नारंगी कोपरी कच्ची खदान रोडवर दिपक चव्हाण ( ४०) या इसमाची हत्या झाल्याची माहिती नागरिकांना शुक्रवारी सकाळी समजताच सदर घटनेबाबत स्थानिकांनी विरार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृत व्यक्तीच्या डोक्यावर व चेहऱ्यावर दगडाने प्रहार केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची तीन विविध पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केल्या असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे.