तीन मांडूळ तस्करांना अटक ; १ कोटी किंमतीचे मांडूळ जप्त
सातारा – तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत असलेल्या मांडुळाची तस्करी करणाऱ्या तिघांना तळबीड, ता. कऱ्हाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ हस्तगत करण्यात आले आहे. रूपेश अनिल साने (वय २५, रा. आड, ता. पोलादपूर, जि. रायगड), अनिकेत विजय उत्तेकर (वय २७), आनंद चंद्रकांत निकम (वय ३५, दोघेही रा. कापडखुर्दे, ता. पोलादपूर, जि. रायगड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले व हवालदार नीलेश विभूते यांना खात्रीशीर माहिती मिळाली, की कऱ्हाड ते सातारा महामार्गावर वराडे गावमध्ये हॉटेलजवळ काही लोक बेकायदेशीर सर्प जातीची मांडूळ विक्रीसाठी घेऊन येणार आहेत.पोलिसांनी याची खातरजमा केल्यानंतर जयशिवराय हॉटेलच्या बाजूला सापळा लावला. तीन संशयित व्यक्ती दुचाकीवरून हॉटेलसमोरील रिकाम्या जागेत येऊन थांबले होते. पोलिसांना त्यांच्या हालचालीवर संशयित वाटल्याने ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये सर्प जातीचे मांडूळ मिळून आले. पोलिसांनी वराडे येथील वनपाल सागर कुंभार यांच्याकडून तो प्राणी मांडूळ असल्याचे खात्री करून घेतली.
तिन्ही संशयितांवर वन्यजीव प्राणी अधिनियमान्वये तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं मांडूळ कराड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कराडचे पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीडचे सहा्य्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक अशोक मदने, सहाय्यक फौजदार काळे, आप्पा ओंबासे, पोलीस नाईक भोसले, संदेश दिक्षीत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली