दोन जेष्ठांच्या हत्येचे गूढ उकलले : दोन आरोपी अटकेत, २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी
विवेक मौर्य
ठाणे : नव्या वर्षाच्या प्रारंभीच ४ जानेवारी, २०२४ रोजी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोस्ती एम्पेरिया, एमएमआरडीए बिल्डींग नं १, मानपाडा इमारतीत समशेर बहादुर रणबाज सिग (६८) आणि सौ मिना समशेर सिंग (६५) या पति पत्नींची दुहेरी हत्येच्या उलगडा शुक्रवारी झाला. चितळसर पोलिसांनी दुहेरी हत्या प्रकरणी निसार अहमद कुतबुध्दीन शेख (२७) आणि रोहित सुरेश उतेकर (२६) या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात नेले असता आरोपीना २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवणायचे आदेश न्यायालयाने दिले. चितळसर पोलिसांनी आरोपीकडून सोन्याच्या बांगडया, तसेच कानातील टॉप्स आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.
मृतक समशेर बहादुर रणबाज सिग(६८) आणि सौ मिना समशेर सिंग(६५) दोघे पतिपत्नी असून बी/१४२६, दोस्ती एम्पेरिया, एमएमआरडीए बिल्डींग नं १, मानपाडा, ठाणे येथे दोघेच राहत होते. त्यांचा एक मुलगा सुधीर सिंग(३८) विवाहित असून तो अंबरनाथ येथे राहावयास होता. तो अधूनमधून आई-वडिलांना भेटण्यास येत होता. घटनेच्या दिवशी ४ जानेवारी, २०२४ रोजी सुधीर आई-वडिलांना दिवसभर फोन करीत होता. प्रतिसाद मिळाला नाही. फोन बंद होते. फोन न उचलल्याने संध्याकाळी ७ वाजता आई-वडिलांच्या घरी आला. तर घर उघडे आढळले. घरात आई व वडिल दोन वेगवेगळ्या बेड वर मृत अवस्थेत दिसले मयत आई व वडिल याची जीभ दातामध्ये अडकली होती व ओठावर रक्त साकळले होते. सुधीर याने पोलिसांना माहिती कळवताच चितळसर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चितळसर पोलिसांची दोन पथक सव्वा महिन्यापासून इमारतीचे सीसीटीव्ही, मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास करीत होते. तर पो. हवा. अभिषेक सावंत पो. शि. शैलेश भोसले स्थानिक लोकांकडून माहिती घेत होते. सीसी टीव्हीत कुणीही बाहेरचा रहिवाशी आढळला नाही. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या स्थानिक रहिवाशांची चौकशी केली. त्यात संशयात अडकलेल्या निसार अहमद कुतबुध्दीन शेख आणि रोहीत सुरेश उतेकर याना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दुहेरी हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी दोघांना शुक्रवारी अटक केली.
अटक आरोपी निसार अहमद कुतबुध्दीन शेख (२७) हा बिल्डिंग नंबर-२ मध्ये रूम नंबर १७०५ मध्ये राहत होता. तर आणि रोहीत सुरेश उतेकर, हा त्याच इमारतीच्या १६ व्य माळ्यावर रूम नं १६२८ मध्ये राहत होता. निसार हा त्याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर आरोपी रोहित उतेकर हा कळवा रुग्णालयात कंत्राटी वॉर्डबॉय म्हणून कार्यरत होता. दोघांनी चोरीच्या उद्देशाने दोघां जेष्ठांचा गळा दाबून हत्या केळ्याची कबुली दिली. तर पोलिसांनी या दोन्ही आरोपीकडून मृतकाच्या चोरीस गेलेल्या सोन्याच्या बांगडया, तसेच कानातील टॉप्स आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.